Purandar International Airport: पुरंदर विमानतळाचे 'टेकऑफ'! पहिल्याच दिवशी 450 एकर जमीन ताब्यात, शेतकऱ्यांना भरगच्च पॅकेज; कोणती गावे समाविष्ट?

पुणे: पुरंदर येथील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. 4 मे रोजी, सोमवारपासून सुरू झालेल्या या भूसंपादन प्रक्रियेत पहिल्याच दिवशी 450 एकर जमिनीचे करारनामे यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. या संपूर्ण भूसंपदन प्रक्रियेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जात आहे, म्हणजे First Come, First Serve तत्वावर ही प्रक्रिया राबवली जात आहे. तसेच, करारावर स्वाक्षरी झाली की लगेच पैसे मिळतील असे आश्वासन जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.
नवीन पॅकेज जाहीर
याशिवाय 5 मे रोजी, मंगळवारी पुरंदर येथील विमानतळासाठी राज्य सरकारने आणखी एक 'पॅकेज' जाहीर केलं आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी प्रति एकरी 1.61 कोटी रुपयांचा दर निश्चित झाला आहे. याशिवाय Purandar Interanational Airport च्या शेजारी उभारण्यात येणाऱ्या AeroCityमध्ये 10 टक्के भूखंड शेतकऱ्यांना परत केला जाईल. याशिवाय विमानतळामुळे बाधित झालेल्या परिवारामधील एका सदस्याला नोकरी देण्यात येईल. पुण्याचे जिल्ह्याधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
"पुरंदर येथील विमानतळाला शासन विशेष प्राधान्य देत असून जमीन मालकांसाठी विशेष पॅकेज ठरवण्यात आलं आहे. सरकार जरी प्रति एकरी 1.61 कोटी रुपये देत असेल तरी इतर सुविधांचा विचार करता शेतकऱ्यांना प्रति एकरी सुमारे 2 कोटींची नुकसान भरपाई नक्कीच मिळत आहे," असे डुडी यावेळी म्हणाले. या जमीन संपादनाची औपचारिक प्रक्रिया 7 मेपासून जिल्हाधिकारी कार्यालय आणि सासवड प्रभाग कार्यालयात सुरू होणार आहे. करारावर स्वाक्षरी करताच RTGSद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया 10 जूनपर्यंत पूर्ण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे.
